इन्स्टाग्रामवरील 'फ्रेंड'ला बेड्या विवाहाचे आमिष दाखवून अत्याचार

Foto

छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) इन्स्टाग्रामवरील मैत्री, भेटीगाठी आणि त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून झालेल्या अत्याचारातून एक तरुणी गर्भवती राहिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हैदराबादच्या पीडित तरुणीच्या तक्रारीवरून मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, सिल्लोड येथील आरोपी तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हैदराबाद येथील पीडित तरुणीची ओळख इन्स्टाग्रामच्या माध्यमातून सलमान मेहमूद शेख (वय २४, रा. आर. लोणवाडी, ता. सिल्लोड) याच्याशी झाली होती. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाल्यानंतर दोघांनी छत्रपती संभाजीनगरमधील मुकुंदवाडी परिसरात भेटण्याचे ठरवले. यावेळी आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून पीडितेसोबत शरीरसंबंध ठेवले, ज्यातून ती गर्भवती राहिली. मात्र, आता आरोपीने लग्नास स्पष्ट नकार दिल्याने तरुणीने पोलिसांत धाव घेतली. मुकुंदवाडी पोलिसांनी १२ मे रोजी कारवाई करत आरोपीला सिल्लोडमधून अटक केली आहे.
दुचाकीच्या क्रमांकावरून पकडला आरोपी
पीडितेकडे सलमानचा मोबाइल क्रमांक होता. शिवाय त्याच्या इन्स्टाग्रामवर दुचाकीचेही अनेक फोटो, व्हिडिओ होते. त्यावरून पोलिसांनी गाडी क्रमांक मिळविला. त्यातून रजिस्ट्रेशन डिटेल्स काढून मोबाइल लोकेशनही मिळवले. एकाच ठिकाणी येताच मुकुंदवाडी ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संजय बहुरे यांच्या पथकाने सिल्लोड गाठून त्याला अटक केली, अशी माहिती पोलीस निरीक्षक सचिन इंगोले यांनी दिली.
https://epaper.sanjwarta. Powered By: Vrudhee Solutions